घरकुल योजनेसाठी १० एकर जागा मिळणार

Foto
फुलंब्रीतील बेघरांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण

फुलंब्री, (प्रतिनिधी): घरकुल येथील ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नसल्यामुळे योजनेचा लाभ घेता येत नव्हता, अशा शेकडो कुटुंबांसाठी फुलंब्री नगरपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. घरकुल योजनेसाठी गट क्रमांक ३३२ मधील १० एकर सरकारी गायरान जमीन मिळविण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता शहरातील गोरगरिबांच्या हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक वर्षांपासून फुलंब्री शहरात अशा अनेक कुटुंबांची संख्या मोठी आहे, ज्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहे किंवा होण्याची शक्यता आहे, मात्र स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने ते या लाभापासून वंचित होते. ही अडचण ओळखून नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलले आहे.

--- नगरपंचायतीचा नियोजित संकल्प ---
सरकारी गायरान जमीन गट क्र. ३३२ मधील जमिनीचा वापर आता घरकुल लाभार्थ्यांसाठी केला जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नाही, अशांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. या १० एकर जागेवर केवळ घरेच नाही, तर रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसह एक आदर्श वसाहत निर्माण करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे.

शहरातील एकही गरीब नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, हा माझा संकल्प आहे. त्यानुसार मी प्रयत्न करीत आहे. १० एकर जमिनीचा हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल, जेणेकरून लवकरात लवकर बेघरांना आपली घरे मिळतील.
- राजेंद्र ठोंबरे, नगराध्यक्ष, फुलंब्री.